निर्गम 14:10-31
Marathi Bible: Easy-to-Read Version
10 फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले. 11 ते मोशेला म्हणाले, “तू आम्हाला मिसरमधून येथे रानात मरावयास का आणले? आम्ही शांतीने मिसरमध्ये मरण पावलो असतो आणि आमच्या कबरांसाठी तेथे भरपूर जागा होती; 12 असे होईल हे आम्ही तुला सांगितले होते! मिसरमध्ये आम्ही म्हणालो, ‘आमची चिंता करु नकोस; आम्ही येथेच राहून मिसरच्या लोकांची सेवाचाकरी करु;’ मिसरामधून येथे रानात येऊन मरण्यापेक्षा, आम्ही मिसरमध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते.”
13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वांचवील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत. 14 शांत राहण्यावाचून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल.”
15 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुला माझा धावा करण्याची काही गरज नाही! इस्राएल लोकांना पुढे चालण्याची आज्ञा कर. 16 तांबड्या समुद्रावर तुझ्या हातातली काठी उगार म्हणजे समुद्राचे दोन भाग होतील आणि इस्राएल लोक भर समुद्रातील कोरड्या भूमीवरून चालत जाऊन समुद्र ओलांडतील. 17 मी मिसरच्या लोकांची मने कठीण केली आहेत म्हणून ते तुमचा पाठलाग करतील. परंतु फारो व त्याचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ यांच्यापेक्षा मी अधिक सामर्थ्यवान आहे, असे माझे महात्म्य मी तुम्हाला दाखवून देईन. 18 मग मिसरच्या लोकांना समजेल की मी गौरवशाली परमेश्वर आहे, फारो व त्याच्या घोडेस्वारांचा व रथांचा पराभव केल्यावर मिसरचे लोक मला मान देतील.”
परमेश्वर मिसरी सैन्याचा पराभव करतो.
19 इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला. 20 अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत.
21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला. तो रात्रभर वाहिला. तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला. 22 आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले. 23 त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्राएल लोकांचा पाठलाग केला. 24 तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. 25 रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसरच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलच्या बाजूने आम्हाविरुद्ध लढत आहे.”
26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल व ते फारोचे घोडे, रथ व स्वार यांना बुडवून टाकील.”
27 म्हणून दिवस उजाडण्याच्या आत मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसरच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यांना पाण्यात बुडवून टाकले. 28 पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही.
29 परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरुन भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30 तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्राएल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली. 31 तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले; तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.
Read full chapter2006 by Bible League International