2 थेस्सलनीकाकरांस 3
Marathi Bible: Easy-to-Read Version
आमच्यासाठी प्रार्थना करा
3 आम्हाला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेतः बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूच्या संदेशाचा प्रसार लवकर व्हावा आणि ते गौरविले जावे. 2 आणि प्रार्थना करा की, हेकट व दुष्ट माणसांपासून आमची सुटका व्हावी कारण सर्वच लोकांचा प्रभूवर विश्वास नाही.
3 पण प्रभु विश्वासू आहे. तो तुम्हांला बळकट करील व दुष्टांपासून तुमचे रक्षण करील. 4 प्रभूमध्ये आम्हांला तुमच्याविषयी विश्वास आहे आणि खात्री आहे की, जे आम्ही तुम्हाला करण्यासाठी सांगत आहोत ते तुम्ही करीत आहात व ते पुढे करीतच राहाल. 5 प्रभु तुमची अंतःकरणे देवाच्या प्रीतीत आणि ख्रिस्ताच्या सोशिक सहनशीलतेकडे नेवो.
कार्य करण्यासाठी अटी
6 आता, बंधूंनो, आम्ही तुम्हांला आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करतो की, जो कोणी बंधु, ज्या परंपरा त्यांना आमच्याकडून मिळाल्या त्या परंपरांप्रमाणे चालत नाही, तर आळशी जीवन जगत आहे तर त्याच्यापासून दूर राहा. 7 मी तुम्हांला हे सांगतो कारण तुम्ही स्वतः जाणता की तुम्ही आमचे अनुकरण कसे करायचे, कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो. 8 किंवा कोणाकडूनही आम्ही फुकटची भाकर खाल्ली नाही, उलट, रात्रंदिवस आम्ही काबाडकष्ट केले यासाठी की तुमच्यावर आम्ही ओझे होऊ नये. 9 याचा अर्थ असा नाही की, आम्हांला तुमच्याकडून मदत मागण्याचा अधिकार नाही, पण आम्ही आमच्या गरजा भागविण्यासाठी काम केले ते यासाठी की, आम्ही तुमच्यासमोर उदाहरण ठेवावे व तुम्ही आमचे अनुकरण करावे. 10 कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.”
11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात) 12 आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वतःची भाकर स्वतःच मिळवून खावी. 13 पण बंधूंनो, तुम्ही तुमच्यासाठी चांगले करीत असता थकू नका.
14 जर कोणी या पत्राद्वारे आमच्या सूचनांचे पालन करीत नाही, तर तो कोण आहे हे लक्षात ठेवा व त्याच्याबरोबर राहू नका, यासाठी की त्याला लाज वाटावी. 15 पण त्याला शत्रू समजू नका, परंतु धाक द्या, जसे त्याला तुमचा भाऊ समजा.
शेवटचे शब्द
16 आता प्रभु स्वतः जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला सर्वकाळ आणि सर्व प्रकारे शांति देवो, प्रभु तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 मी पौल माझ्या स्वतःच्या हातांनी हा सलाम लिहितो. माझ्या प्रत्येक पत्राची ही खूण आहे. ह्या प्रकारे मी प्रत्येक पत्र लिहितो व अशा प्रकारे लिहितो.
18 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2006 by Bible League International