स्तोत्रसंहिता 111
Marathi Bible: Easy-to-Read Version
111 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात
त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या
चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो.
त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे
हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो.
देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या
त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते.
त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात.
त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9 देव आपल्या माणसांना वाचवतो.
देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते.
जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात.
देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
2006 by Bible League International