यिर्मया 37
Marathi Bible: Easy-to-Read Version
यिर्मयाचा तुरुंगवास
37 नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा होता. नबुखद्नेस्सरने, यहोयाकीमचा मुलगा यहोयाकीन उर्फ यकोन्या याच्याऐवजी, सिद्कीयाला यहूदाचा राजा केले. सिद्कीया योशीयाचा मुलगा होता. 2 पण, परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्यातर्फे दिलेल्या संदेशाकडे सिद्कीयाने लक्ष दिले नाही. सिद्कीयाच्या सेवकांनी व यहूदाच्या लोकांनीही परमेश्वराच्या संदेशांकडे दुर्लक्षच केले.
3 राजा सिद्कीयाने यहूकल व याजक सफन्या ह्यांना आपला निरोप देऊन यिर्मया संदेष्ट्याकडे पाठविले, यहूकल शलेम्याचा व याजक सफन्या मासेयाचा मुलगा होता. त्यांनी यिर्मयासाठी आणलेला निरोप असा होता “यिर्मया, आमच्यासाठी परमेश्वर देवाजवळ प्रार्थना कर.”
4 त्यावेळी, यिर्मयाला कैद केलेले नव्हते, त्यामुळे तो कोठेही जाण्यास मोकळा होता. 5 नेमके ह्याच वेळी मिसर देशातून फारोचे सैन्य यहूदाकडे आले. यरुशलेम जिंकून घेण्यासाठी खास्द्यांच्या सैन्याने त्या नगरीला वेढा घातला होता. त्यांच्यावर मिसरचे सैन्य चालून येत आहे हे त्याने ऐकले. म्हणून मिसरच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी खास्द्याच्या सैन्याने यरुशलेम सोडले.
6 संदेष्टा यिर्मयाला देवाचा संदेश आला. 7 “परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो, ‘यहूकल व सफन्या, यहूदाचा राजा सिद्कीया याने तुम्हाला मला काही प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे पाठविले आहे, हे मला माहीत आहे. सिद्कीयाला सांगा की बाबेलच्या सैन्यापासून तुम्हाला वाचविण्यासाठी फारोचे सैन्य मिसरमधून निघाले आहे. पण त्या सैन्याला मिसरला परत जावे लागेल. 8 मग बाबेलचे सैन्य परत येईल. ते यरुशलेमवर हल्ला करील. ते यरुशलेमचा पाडाव करुन यरुशलेम जाळील.’ 9 परमेश्वर पुढे असे म्हणतो, ‘यरुशलेमच्या लोकांनो, स्वतःची फसवणूक करुन घेऊ नका. “बाबेलचे सैन्य नक्कीच आपल्याला सोडून माघारी फिरेल, असे समजू नका.” तसे होणार नाही. 10 यरुशलेमच्या लोकांनो, समजा, जरी तुम्ही, तुमच्यावर चाल करुन आलेल्या खास्द्यांच्या सैन्याचा पराभव करु शकला, तरी काही जखमी सैनिक त्यांच्या तंबूत राहतील. ते येऊन यरुशलेम जाळतील.’”
11 जेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, मिसरचा राजा फारो याच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी, यरुशलेम सोडले, 12 तेव्हा यिर्मयाला, यरुशलेमहून मालमत्तेची वाटणी व्हायची होती म्हणून यिर्मया तेथे जाणार होता. 13 पण यिर्मयाला यरुशलेमच्या बन्यामीन प्रवेशद्वाराजवळ जाताच, तेथील पहारेकऱ्यांच्या प्रमुखाने त्याला अटक केले. त्या प्रमुखाचे नाव इरीया होते. इरीया शलेम्याचा मुलगा होता. व शलेम्या हनन्याचा मुलगा होता. इरीयाने यिर्मयाला अटक केले व तो म्हणाला, “यिर्मया, तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला जात आहेत.”
14 यिर्मया इरीयाला म्हणाला, “हे खरे नाही मी तुम्हाला सोडून खास्द्यांकडे जात नाही” पण यिर्मयाचे म्हणणे इरीयाने ऐकले नाही. त्यांनी यिर्मयाला अटक करुन यरुशलेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेले. 15 ते अधिकारी यिर्मयावर खूप रागावले. त्याने यिर्मयाला चोपून काढण्याचा हुकूम दिला. मग त्यांनी यिर्मयाला तुरुंगात ठेवले, तुरुंग योनाथान नावाच्या माणसाच्या घरात होता. योनाथान यहूदाच्या राजाचा लेखनिक होता. त्याच्या घराचाच तुरुंग केला होता. 16 त्या लोकांनी योनाथानच्या घराच्या तळघराच्या अंधार कोठडीत [a] यिर्मयाला ठेवले. यिर्मया तेथे बराच काळ होता.
17 मग सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलाविणे पाठविले आणि त्याला राजावाड्यात आणले. सिद्कीया एकांतात यिर्मयाशी बोलला. त्याने यिर्मयाला विचारले, “परमेश्वराकडून काही संदेश आला आहे का?”
यिर्मयाने उत्तर दिले, “हो! परमेश्वराकडून संदेश आला आहे. सिद्कीया, तुला बाबेलच्या राजाच्या स्वाधीन केले जाईल.” 18 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “माझे काय चुकले! मी तुझ्याविरुद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वा यरुशलेमच्या लोकांविरुद्ध काय गुन्हा केला? मला तुरुंगात का टाकलेस? 19 राजा सिद्कीया, तुझे संदेष्टे कोठे आहेत? त्यांनी तुला खोटा संदेश दिला. ते म्हणाले ‘बाबेलचा राजा तुझ्यावर किंवा यहूदावर हल्ला करणार नाही.’ 20 पण आता, माझ्या धन्या, यहूदाच्या राजा, कृपया माझे ऐक. माझी विनंती तुला मान्य होवो. योनाथान लेखनिकाच्या घरी मला परत पाठवू नये एवढेच माझे मागणे आहे. तू मला परत पाठविलेस, तर मी तेथे मरेन.”
21 म्हणून सिद्कीया राजाने यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेवण्याचा हुकूम दिला व यिर्मयाला रस्त्यावरील रोटीवाल्याकडून रोटी द्यावी असे ही सांगितले. नगरातील रोट्या संपेपर्यंत यिर्ममाला रोटी दिली गेली. अशा रीतीने यिर्मया चौकात पहारेकऱ्याच्या नजरेखाली राहिला.
Footnotes
- यिर्मया 37:16 अंधार कोठडी जमिनीत खोलवर असलेले गुहेसारखे भुयार. याचा उपयोग तुरुग म्हणून करीत.
2006 by Bible League International