यशया 61
Marathi Bible: Easy-to-Read Version
परमेश्वराचा मुक्तीचा संदेश
61 परमेश्वराचा सेवक म्हणतो, परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले. 2 परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले. 3 सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्यांचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना “चांगले वृक्ष” आणि “परमेश्वराची सुंदर रोपटी” अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
4 त्या वेळेला नाश केली गेलेली जुनी शहरे पुन्हा वसविली जातील. ती आरंभी होती तशी नव्याने केली जातील. फार फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी केली जातील.
5 नंतर तुमचे शत्रू तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मेंढ्यांची काळजी घेतील. तुमच्या शत्रूंची मुले तुमच्या शेतांतून आणि मळ्यांतून कामे करतील. 6 तुम्हाला “परमेश्वराचे याजक”, “आमच्या देवाचे सेवक” असे म्हटले जाईल. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्हाला मिळेल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.
7 पूर्वीच्या काळी लोकांनी तुमची अप्रतिष्ठा केली, तुमची निंदा केली. इतर लोकांपेक्षा तुमची अप्रतिष्ठा जास्त झाली. म्हणून तुमच्या जमिनीतून तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट पीक मिळेल. तुम्हाला अखंड आनंद मिळेल. 8 असे का घडेल? कारण मी परमेश्वर आहे आणि मला प्रामाणिकपणा आवडतो. मला चोरी व प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. म्हणून मी लोकांना योग्य तेच फळ देईन. मी माझ्या लोकांबरोबर कायमचा, करार केला आहे. 9 सर्व राष्ट्रांतील एकूण एक लोक माझ्या लोकांना ओळखतील. माझ्या राष्ट्रातील मुलांना प्रत्येकजण ओळखेल. त्यांना पाहताच कोणालाही कळून येईल की ह्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे.
देवाचा सेवक तारण व चांगुलपणा आणतो
10 परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो.
देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे.
परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो.
हे कपडे स्वतःच्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत.
परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो.
वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
11 जमीनीमुळे रोपे वाढतात.
लोक शेतांत बी पेरतात.
ते बी जमिनीत रूजून वाढते.
त्याचप्रमाणे परमेश्वर चांगुलपणा वाढवील,
सर्व राष्ट्रांत त्याची प्रशंसा अधिकच वाढवील.
2006 by Bible League International