मार्क 16
Marathi Bible: Easy-to-Read Version
येशू मरणातून उठला हे अनुयायांना कळते(A)
16 शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3 त्या एकमेकीस म्हणत होत्या की, “कबरेच्या तोंडावरुन आणांसाठी धोंड कोण बाजूला लोटील?”
4 नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5 त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
6 तो त्यांना म्हणाला, “भयभीत होऊ नका, तुम्ही नसरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पाहा. 7 जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, ‘तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’”
8 मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही. कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
काही शिष्य येशूला पाहतात(B)
9 आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरीया मग्दालियाला, जिच्यातून त्याने सात भुते काढली होती, तिला दर्शन दिले. 10 ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. 11 त्यांनी ऐकले की तो जिंवत आहे. व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
12 यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रगट झाला. 13 ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांवरही विश्वास ठेवला नाही.
येशू शिष्यांबरोबर बोलतो(C)
14 नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली. कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
15 तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा धिक्कार होईल. 17 परंतु जे विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भुते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. 18 ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
येशू परत स्वर्गात जातो(D)
19 मग प्रभु येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. 20 शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुर्वार्तेची घोषणा केली. प्रभुने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
2006 by Bible League International