एस्तेर 6
Marathi Bible: Easy-to-Read Version
मर्दखयचा सन्मान
6 त्याच दिवशी रात्री राजाला झोप येईना. म्हणून त्याने एका सेवकाला कालवृत्तांत आणायला सांगून वाचून दाखवायला सांगितला. (एखाद्या राजाच्या कारकिर्दीतील सगळ्या घडामोडी या राजांच्या इतिहासग्रंथात नोंदवलेल्या असतात.) 2 सेवकाने तो वृत्तांत राजाला वाचून दाखवला. राजा अहश्वेरोशला ठार करण्याच्या कटाबद्दलचा मजकूर त्याने वाचला. राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या राजाच्या दोन सेवकांनी राजाचा वध करायचा कट रचला होता पण मर्दखयला या कटाचा सुगावा लागला आणि त्याने ही बातमी एकाला दिली. त्याची ती हकीकत होती.
3 त्यावर राजाने विचारले, “त्याबद्दल मर्दखयचा सन्मान कसा केला गेला? त्याला काय इनाम दिले?”
तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “मर्दखयसाठी काहीच केले गेले नाही”
4 हामान तेव्हा नुकताच राजमहालाबाहेरच्या आवारात शिरत होता. आपण उभारायला सांगितलेल्या वधस्तंभावर मर्दखयला फाशी द्यायला त्याला राजाला सांगायचे होते. राजाला त्याची चाहूल लागली. राजा म्हणाला, “आत्ता चौकात कोण आले?” 5 राजाचे सेवक म्हणाले, “हामान चौकात थांबला आहे”
तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या”
6 हामान आत आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हामान, राजाला एखाद्याचा सन्मान करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावे?”
हामानने मनातल्या मानात विचार केला, “राजाला सन्मान करावासा वाटेल असा माझ्याखेरीज दुसरा कोण असणार? माझेच गौरव करण्याबद्दल राजा बोलत आहे हे नक्की.”
7 तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे, 8 राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्त्र नोकरांमार्फत आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुगुट आणावा. 9 मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्त्र आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्त्रे घालावीत आणि त्याला घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यांवर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की ‘राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.’”
10 “मग जा पटकन” राजा हामानला म्हणाला. “वस्त्र आणि घोडा घेऊन ये आणि तू सुचवलेस त्याप्रमाणे सगळे यहुदी मर्दखय साठी कर. मर्दखय राजद्वाराजवळच बसलेला आहे. तुझ्या सुचनेप्रमाणे सर्व काही कर.”
11 तेव्हा हामानने वस्त्र आणि घोडा आणाला. मर्दखयला ते वस्त्र घालून त्याला घोड्यावर पुढे बसवून नगरातील रस्त्यांवर फिरवले. मर्दखय पुढे चालून त्याने ललकारी दिली, “राजा एखाद्याच्या सन्मानार्थ असे करतो.”
12 एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान घाईघाईने घरी परतला. शरमिंदेपणाने खाजील होऊन त्याने आपले तोंड झाकून घेतले. 13 आपली बायको जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानची बायको आणि त्याला सल्ला देणारे मित्र त्याला म्हणाले, “मर्दखय यहुदी असेल तर तुझी जीत होणे शक्य नाही. तुझ्या अधःपाताला सुरुवात झाली आहे. तुझा विनाश होईल हे नक्की.”
14 हे सगळे हामानशी बोलत असतानाच राजाचे खोजे हामानच्या घराकडे आले. एस्तेरने आयोजित केलेल्या मेजवानीला निघायची त्यांनी त्याला घाई केली.
2006 by Bible League International